ओ कुणी नवरी देता का... नवरी sss : ग्रामीण भागातील पालकांची आर्त हाक, तर लग्नाळू मुलांच्या आशाळभूत नजरा !
संडे स्पेशल, प्रशांत वाघमारे
ओ कुणी नवरी देता का... नवरी sss : ग्रामीण भागातील पालकांची आर्त हाक, तर लग्नाळू मुलांच्या आशाळभूत नजरा !
ग्रामीण भागातील पालकांसमोर आता सर्वात मोठी गुंतागुंतीची व बहुआयामी समस्या उभी आहे की, त्यांच्या घरामध्ये लग्नाचा मुलगा आहे , परंतु त्यासाठी नवरीच मिळेनाशी झालेली आहे. पूर्वी चांगल्या स्थळासाठी मुलीच्या बापाला नवरदेवाचे उंबरटे झिजवावे लागत होते. आता परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये किमान 20 ते 30 लग्नाळू मुले लग्न करण्यासाठी नवरी मिळेल का? या प्रश्नाकडे आशाळभूत नजरेने पहात आहेत. कोणत्याही कार्यक्रमांमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी एकच विचारणा होते ओ नवरी देता का.. नवरीsssss.
खरे तर या समस्येचे खरे कारण आपणच आहोत. कुटुंबाला वारस हवा या नावाखाली अजूनही अनैतिक मार्गाने स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे.सरासरी 1000 मुलांमागे आज ही मुलींचा जन्मदर 868 ते 898 आहे. यासाठीच ग्रामीण भागातील पालकांच्या व लग्नाळू मुलांच्या डोळ्यात अंजन घालावे अशा अनेक गोष्टींचा विचार गांभीर्याने करायलाच हवा.
नोकरीस प्राधान्य व शेती व्यवसायास दुय्यम स्थान.
आज-काल प्रत्येक मुलीच्या बापाला आपली मुलगी नोकरदारलाच द्यावी असे वाटते. निसर्गाच्या लहरीपणामुळे व बाजारपेठेत योग्य हमीभाव नसल्याने शेती करणाऱ्या मुलांबाबत, स्वतः शेतकरी असणाऱ्या मुलीच्या बापाचेही मत तितकेसे अनुकूलन नाही. मुलगा नोकरीस असणे, त्यातल्या त्यात तो सरकारी नोकरीस असेल तर त्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. परंतु आजकाल आधुनिक पद्धतीने व जागतिक बाजारपेठेचा विचार करत शेती करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणारी मुलंही मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.
शिक्षण व रोजगाराच्या संधीचा अभाव.
सध्याच्या काळामध्ये उच्चशिक्षणामध्ये मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती करत सर्वच क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी मिळवलेल्या आहेत. अनेक सवलती,योजना जाहीर करत शासन ही मुलींना मदत करत आहे. उच्चशिक्षित व जॉब करणाऱ्या मुलींनी त्यांच्या तोडीचा नवरदेव पाहण्याची अपेक्षा ठेवणे काहीच गैर नाही. बरीचशी मुले मात्र पात्रता असूनही अनेक स्तरावरील भुलभुलय्या माध्यमांच्या नादी लागून शिक्षण व नोकरीच्या बाबतीत मागे पडल्याचे दिसून येतात. आवश्यक पात्रता नसल्याने शहरात व रोजगाराच्या संधी नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांना याबाबतीत कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेची गरज बघून व योग्य कौशल्यांचा वापर करत व्यवसाय केल्याने अनेक तरुण आता पुढे जात आहेत. त्याचबरोबर अनेक तरुणांनी पारंपारिक शेती बरोबर शेतीपूरक व्यवसायाचा ही मार्ग अवलंबलेला आहे. हा आदर्श आता ग्रामीण भागातील सर्वच तरुणांनी घ्यायला हवा. पालकांनी व तरुणांनी या गोष्टीचा आता गांभीर्याने विचार करायलाच हवा.
आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता व स्वातंत्र्य.
आज कालच्या मुलींना स्वतःच्या बाबतीत आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता फार महत्त्वाची वाटते. आयुष्यामध्ये कधी; कोणती व कशी वेळ येईल सांगता येत नाही, त्यासाठी त्या जास्तीत जास्त आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागात अजूनही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे मुलींना ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य मिळेल का याविषयी शंका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना नाकारण्याचे प्रमाण जास्त आहे.
सांस्कृतिक व सामाजिक घटक
. शहरी सुख सोयीनी युक्त विलासी जीवन जगण्याची आजकाल प्रत्येक मुलींची अपेक्षा आहे. पालकही या अपेक्षेस खतपाणीच घालतात. आज ही सांस्कृतिक दृष्ट्या अनेक अवाजवी बंधने स्त्रियांवर आहेत. त्यामानाने शहरी वातावरणात मुलींना मोकळेपणाने वावरता येते. आज-काल रूढी परंपरेचे ओझे व समाजात मिळणारी दुय्यम वागणूक मुलींना नको असते.त्यातच आजकालच्या मुलींना व मुलींच्या आईंला मुलींना सासरी जबाबदारी नको असते. स्वतःचा संभाळ सुनेने नीटनेटका करावा असे म्हणणाऱ्या आई-बाबांना आपल्या मुलीच्या बाबतीत मात्र, सासू-सासरे किंवा इतर नातेवाईकांची जबाबदारी मुलीला असू नये असे वाटते.
मुलीच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा.
कमावत्या मुलींनी आई बापाला आधार देणे गरजेचे आहे परुंतू नोकरी करणाऱ्या मुलीकडून आपणास आर्थिक लाभ मिळावा यापासून ते मुलींना मिळणाऱ्या सुख सोयी बाबत अवास्तव अपेक्षा आजकाल पालकांच्या वाढलेले आहेत. कुटुंब व्यवस्था व स्वतःच्या जबाबदाऱ्या याबाबत वेळीच मुलींनाही जाण करून देणे गरजेचे आहे. कर्तुत्व असेल तर इतर अनेक गोष्टींना गौण स्थान द्यायला हवे हे आता पालकांनाही समजायला हवे.
मुला मुलींनी आता अनुकरणशिल न होता, स्वतःमध्ये काय आहे हे शोधायला पाहिजे. स्वतःची पात्रता ही तपासायला हवी. त्यानुसारच आपल्या अपेक्षा ठेवणे गरजेचे आहे.
मुलांच्या व्यक्तिमत्त्वास प्राधान्य
आजकाल मुलांच्या व्यक्तिमत्वास ही लग्न करताना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. मुलांचे राहणीमान पाहिले जाते.त्यांचे बोलणे, लकब, भाषा, निर्वसनीपणा, व्यवसाय याबाबतीत ही विचार केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाच्या एकंदरीत वर्तणुकीची माहिती मिळवली जाते. त्यासाठी पालकांची व मुलांची वर्तणूक समाजामध्ये चांगल्याच प्रकारचे असायला हवी. त्यासाठी मुलांच्या मित्रपरिवारा बाबत वारंवार दक्षता घ्यायला हवी. अनेक वेळा ग्रामीण भागात एकमेकांना चुकीची माहितीही पुरवले जाण्याची शक्यता असते. त्यामागे चांगली मुलगी आपल्या संबंधित मुलाला मिळावी यापासून ते वैयक्तिक, सामाजिक द्वेषही असू शकतात.
पालकांच्या व मुलांच्या भ्रामक संकल्पना.
अनेक वेळा मुला मुलींची इतरांशी तुलना केली जाते. जोडीदार, नोकरी, गोरावर्ण, पांढरे डाग, कुळीतील फरक, उच्च नीचपणा याबाबत अनेक भ्रामक संकल्पना लोकांमध्ये असतात. नवरा किंवा बायको ही काही मिरवायची गोष्ट नाही तर ती आयुष्य निभावायची गोष्ट आहे.हे आता मुलांच्या मनामध्ये ठामपणे बिंबवले पाहिजे.
आंतरजातीय विवाहांना प्राधान्य.
आज-काल मुलांना नवरी मिळत नाही म्हणून, मराठवाडा; विदर्भ किंवा आदिवासी दुर्गम भागातून लग्न करून सूना घरी आणल्या जातात. त्यांच्याविषयी काहीही माहिती नसते. त्यातून अनेक फसवणुकीचे प्रकार आपण रोजच पाहत, ऐकत आलेलो आहोत. एवढे सगळे असतानाही माहितीच्या मुला मुलीशी केलेले आंतरजातीय लग्न अजूनही लोकांना मान्य होत नाही. बहुतेक वेळा मुलींशी खुलेपणाने चर्चा न झाल्यास, योग्य मार्गदर्शनाअभावी मुलींना स्वतःच्या आयुष्यभराचे नुकसान करून घ्यावे लागते. अनेकांना आंतरजातीय लग्न ही घटना अपमानास्पद वाटते. त्यातून अनेक दुर्घटना ही होतात. परंतु भविष्यात मुलींचे प्रमाण मोठ्या संख्येने कमी होत आल्याने, योग्य जोडीदार असेल तर आंतरजातीय लग्नाचा विचार आता ग्रामीण भागातील ही लोकांना करावाच लागेल.
आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना व त्यांच्या पालकांना बदलावेच लागेल. तरच योग्य नवरी मिळेल, नाहीतर आता सारखेच म्हणावे लागेल ओ कुणी नवरी देता का... नवरीssss -
What's Your Reaction?