अध्यात्मात वाढतोय तरुणाईचा सहभाग

अध्यात्मात वाढतोय तरुणाईचा सहभाग

संडे स्पेशल , प्रशांत वाघमारे 
अध्यात्मात वाढतोय तरुणाईचा सहभाग
     रोज आपण प्रत्येक प्रसार माध्यमांमध्ये महाकुंभ मेळ्याचे वर्णन वाचत आहोत.144 वर्षांनी येणाऱ्या या  दुर्मिळ मंगल प्रसंगी जवळपास 40 कोटी लोक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये अनेक उच्च पदस्थ, गलेलठ्ठ पगार असणारे आयआयटीयन,अनेक देशातील परदेशी नागरिक ही सहभागी होत आहेत. पंढरपूरचे उदाहरण पाहिल्यास चार वारीमध्ये पूर्वी येणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा वर्षभरातील सुट्टीच्या दिवशी व महिन्याच्या एकादशी दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. हीच बाब तुळजापूर, अक्कलकोट, बाळूमामा व अनेक गणेश मंदिराच्या बाबतीत दिसून येते. यामध्ये सर्वत्र दिसणारी प्रशंसनीय गोष्ट म्हणजे यासर्व ठिकाणी तरुणाईचा वाढता सहभाग व उघड्या डोळ्यांनी स्वीकारत असलेले अध्यात्म!
     पूर्वी एकमेकांवर अवलंबून असणारी माणसे, पैसा स्वस्त झाल्याने प्रत्येक नात्यांपासून दुरावलेली आहेत. माणसा माणसातील विसंवाद, अविश्वासाची भावना आणि सर्वात म्हणजे असुरक्षिततेची जाणीव तरुणाईला अध्यात्माकडे ओढत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी मुळे होणारी आर्थिक कुचंबणा, व्यसनाधीनता, नोकरीच पाहिजे या मानसिकतेत असणारा समाज, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी नाही, व्यवसाय करायची हिंमत नाही आणि म्हणावा तेवढा पाठिंबाही नाही. फक्त पैशासाठी चालणारी प्रचंड धावपळ व आभासी सुख!  या पलीकडे जाऊन आता तरुणाईला भावनिक आणि मानसिक आधाराची फार गरज निर्माण झालेली आहे. यामुळेच मनाला हव्या असणाऱ्या शांततेच्या शोधार्थ तरुणाई आता उघड्या डोळ्यांनी अध्यात्माकडे पाहत आहे. 
     समाजामध्ये सर्वत्र सजगपणे वावरत असताना अनेक वेळा अर्धवट आध्यात्मिक अभ्यास  असणारी, अध्यात्माचा ठेका घेऊन औडबर माजवणारी व्यवसायिक जमात तरुणाईला सर्वत्र दिसून येते. स्वतःला महाराज, आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या स्वार्थी माणसाने भोळ्या भााबड्या  भक्तांची केलेली लुबाडनुक तो डोळसपणे पाहत आहे. त्याचबरोबर लोकांना अधिक पैसे मिळायला लागले की त्यांचा देवही बदलत जातो. पांडुरंगाला येणारी माणसं, थोडा अधिक पैसा मिळाला की  शिर्डीला जातात त्याहूनही अधिक पैसा मिळायला लागला की ती तिरुपती बालाजीला जातात, असे सर्वसाधारण मत आहे. हे सर्व आताची तर नाही उघड्या डोळ्यांनी पहात आहे. त्यातूनच त्याचा निर्मळ अध्यात्माकडे कल वाढतोय.
      आध्यात्मिक साहित्य, ग्रंथ, पुस्तके यांचा स्वतः तौलणिक अभ्यास करण्यावर तरुणाईचा सध्या भर दिसून येतो. ढीगभर पोथी, पुराण्यापेक्षा समर्पक ग्रंथातील साहित्याचा तरुणाई चिकित्सकपणे अभ्यास करताना दिसून येत आहे.गंध, टिळा, उपवास या जंजाळात न अडकता, तो कीर्तन आणि प्रवचनातील विचारांची आता चिरफाड करू लागला आहे. प्रसिद्धी माध्यमातून केली जाणारी देवांची प्रसिद्धी आणि प्रचारा बरोबरच त्यातील अंधश्रद्धा, व्यवसायिकीकरण ही तो आता बरोबर ओळखतो.
     अध्यात्म आणि पर्यटन, अध्यात्म आणि औडंबर याचबरोबर अध्यात्माची परिपूर्णता याची समज आता तरुणाईकडे 
वाढत चाललेली आहे. त्यासाठी त्याला सर्वात मोठा आधार मिळतोय तो*इंटरनेटचा! इंटरनेटच्या माध्यमातून अगदी सहज सोप्या पद्धतीने अध्यात्माची  चिकित्सक माहिती तो आता प्राप्त करू लागला आहे. त्याच्या मनामध्ये*भेडसावणाऱ्या विविध शंका की ज्या  निरसन करण्यापेक्षा अनेक जण टाळत होते. त्या आता या इंटरनेटच्या*माध्यमातून विविध ठिकाणी, परिपूर्ण आध्यात्मिक अभ्यास असणाऱ्या गुरूंच्या व्यक्त होणाऱ्या विचारांच्या संकलनातून निरसन होत आहेत. जगातील प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या,जाणवणाऱ्या,भासणाऱ्या अध्यात्माचा तो  तुलनात्मक अभ्यास करीत आहे. त्यातून त्याला हव्या त्या गोष्टीची आता पडताळणी तो पडताळणी करून घेत आहे. कोणत्याही प्रकारचे स्तोम न माजवता, अंधश्रद्धेला थारा न देता, अनिष्ट रूढी परंपरेला फाटा देत, भक्ती मधून प्रगती साधण्याची त्याची तयारी उल्लेखनीय असल्याचे जाणवते. हेच  आपणास प्रत्येक अध्यात्मिकतेच्या ठिकाणी होणाऱ्या तरुणाईच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. वेगळी वाट शोधण्याचा त्याचा प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे. 
     आपण तरुणाईला फक्त कपडे ,राहणीमान किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या भाषेवरून जज करत असतो. परंतु आपल्या कल्पनेपलीकडेही जात तरुणाईचा मार्ग हा चिकित्सकपणे उघड्या डोळ्यांनी अध्यात्माकडे पहात अध्यात्म स्वीकारण्याकडे वाढल्याचे जाणवते. तेच आपणास कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या साधुसंतांबरोबरच भक्तांमधील वाढत्या तरुणाईच्या संख्येवरून दिसून येते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow