बचत गटाच्या पावलांनी लक्ष्मी आली घरा : कुटुंबांचा वाढला आर्थिक स्तर
संडे स्पेशल प्रशांत वाघमारे
बचत गटाच्या पावलांनी लक्ष्मी आली घरा
: कुटुंबांचा वाढला आर्थिक स्तर
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी... खरोखरच घरातील महिला जर दुसऱ्यावर अवलंबून न राहता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली तर ती तिच्या सासरी, माहेरी व आसपासच्या महिलांना सर्वांगाने सक्षम बनवण्यास कारणीभूत ठरते, पर्यायाने ती कुटुंबाबरोबरच समाजाचा; गावाचा विकास ही साधण्यास हातभार लावते. हेच सिद्ध झाले आहे बचत गटाच्या माध्यमातून; घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठिंब्याने लहान मोठे अनेक उद्योग उभारून महिलांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले आहे. खऱ्या अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून आता घरोघरी लक्ष्मीच आलेली आहे. आता आपलीही जबाबदारी आहे, आपण सर्वांनी ठामपणे या बचत गटांच्या पाठीमागे उभे राहण्याची, त्यांच्या वस्तू खरेदी करण्याची, त्याचबरोबर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची!
बचत गटातील महिला आता कुटुंबाबरोबरच आपल्या छोट्या मोठ्या उद्योगांचे वार्षिक आर्थिक नियोजन करू लागल्या आहेत. परावलंबना कडून स्वावलंबनाकडे जात असतानाच आता त्यांना कौटुंबिक व सामाजिक निर्णयामध्येही मानाचे स्थान दिले जात आहे. बचत गटामुळे महिलांना बाहेरचे जग समजण्यास मदत होत असून चांगले आणि वाईट याची वास्तविक जाणीव होत आहे. महिलांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असून आता त्या इतरही महिला व मुलींना शिकण्यास प्रोत्साहन देत आहेत. बँकिंग व्यवहार व डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये आता महिलांनी भरारी घेतली असून त्यातील सर्व बारकावे समजण्यास त्यांना मदत झाली आहे. त्यामुळे वैयक्तिक व सामाजिक उन्नती साधून साधण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत.
बचत गटातील सक्रिय सहभागामुळे महिलांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय दर्जा आता उंचावला असून स्वतःचं वेगळं अस्तित्व महिलांनी निर्माण केला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्या आता अग्रेसर होत आहेत. स्वतःचे मनोबल वाढल्याने कौटुंबिक व सामाजिक समस्येमध्ये त्या आता सर्वांबरोबर चर्चेने मार्ग काढत असून, विविध क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतः स्वतःचे विविध उपक्रम राबवत आहेत.
बचत गटाच्या निमित्ताने आता शहरी व ग्रामीण भागातील महिलांचे एकत्रीकरण,एकजूट झाली असून त्यातून सकस सामाजिकत्व निर्माण होत आहे. त्यांना विविध रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून त्यातूनच त्यांचा कौटुंबिक ,सामाजिक, आर्थिक विकास होत आहे. उपजतच असणाऱ्या त्यांच्या बचतीच्या सवयीच्या जोडायला त्यांना आता व्यवहारी ज्ञान मिळत असल्याने ग्रामविकास साधण्यास चालना मिळत आहे. संघटन शक्ती मजबूत झाल्याने एकमेकींचे दुःख समजावून घेऊन त्या आता एकमेकांना आधार देत, विचारांची देवाणघेवाण करत विविध समस्येवर; अन्याय अत्याचारावर मात करीत आहेत. वैयक्तिक आरोग्याविषयी महिलांमध्ये आता मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे. त्या आता पंचायत राज्य संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होत असून विविध शासकीय योजनांची ही माहिती करून घेतात व इतरांनाही देत आहेत. स्वतःला जगण्यासाठी निरंतर कायमस्वरूपी उद्योग आता महिलांकडून उभारले जात असून, त्याचा फायदा आता कुटुंबाची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यास नक्कीच होत आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला जीवन उन्नती अभियान यांच्यामार्फत विविध प्रचंड संख्येने शहरी व ग्रामीण भागात बचत गटांची निर्मिती करण्यात आलेली आहे.बचत गटामध्ये दहा ते वीस महिला सदस्य असतात. त्यातूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. प्रत्येक महिन्याला त्यांची मीटिंग होते. एकाच घरातील अनेक महिला सदस्य यामध्ये सहभागी होऊ शकतात.राष्ट्रीय बँका मार्फत त्यांच्या बचतीच्या पाच पट कर्ज त्यांना दिले जाते. त्यावरती 70 पैसे व्याजदर पडतो. काही बचत गटांनी 25 लाखापर्यंत कर्ज घेतलेले आहे.
आज आपण सहज जरी प्रदर्शनामध्ये पाहिले तर बहुतेक स्टॉल हे बचत गटाचे असतात. बचत गटांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर तर झुंबड उडालेली असते. यामध्ये प्रत्येक भागातील विविध पद्धतीचे सुग्रास अन्नपदार्थ तर आपण खातोच पण त्याचबरोबर पापड, लोणचे, कडक भाकरी, तयार मसाले, शेवया यांनाही आपण पसंती देतो. दिवाळीसाठी महालक्ष्मी साठी लागणारे फराळाचे साहित्य, उन्हाळ्यात बनवलेल्या कुरवड्या, पापड्या, भातवड्या आता बहुतेक जण बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले जाणत असतात. आता बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेली उद्योग एवढ्यावरच थांबलेले नाहीत. ग्रामीण भागातील महिलांनी तर शेतीवर आधारित अनेक उद्योगांत भरारी घेतलेली आहे. त्यामध्ये रेशीम उद्योग, गटशेती, मका भरडा, तेल घाला, कुकूटपालन, दूध संकलन, केळी वेफर्स युनिट, पाळीव प्राण्यांचे पालन, फरसाण निर्मिती, सेंद्रिय भाजीपाला व खत निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मिती याबरोबरच अनेक शेतीवर आधारित लघुउद्योग ही सुरू आहेत. शासकीय कार्यालयातील सायकल, स्कूटर स्टॅन्ड चालवणे. त्याचबरोबर उपहारगृह चालवने, कापड दुकान चालवणे, मूर्ती तयार करणे तुळशी माळ तयार करणे नॅपकिन चे बुके तयार करणे असे उद्योग ही बचत गट करतात. अंगणवाडींना पूरकआहार पुरवणे, प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार शिजवणे ही कामेही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला करतात.
आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना भाग भांडवल बचत गटाच्या माध्यमातून मिळत असल्याने आता अनेक छोटे-मोठे उद्योग उभारून पूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो.
आता गरज आहे समाजाने ठामपणे या बचत गटाच्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची, त्यांचे सर्व पदार्थ; वस्तू स्वतः खरेदी करण्याची व त्यांच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची!यातूनच कुटुंबाची उन्नती व विकास साधला जात आहे. पर्यायाने गावाची, शहराची व देशाची प्रगती साधण्यास फार मोठा हातभार या महिलांचा, बचत गटांचा लागत आहे. आपलाही थोडा हातभार या बचत गटांना आता सर्वांनी लावला पाहिजे!
महिलांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कुटुंबाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती बचत गटाच्या माध्यमातून साधत देशाच्या विकासात बचत गटाचा मोठा हातभार लागत असून, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत विठाई लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने तालुक्यामध्ये 1025 बचत कार्यरत आहेत. त्यातून 10,725 महिला विविध उद्योग करीत आहेत. चालू आर्थिक वर्षात 380 बचत गटांना 11 कोटी 30 लाख 70 हजार 200 रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे व्यवस्थापक वंदना बिडकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला जीवन उन्नती अभियानाच्या मार्फत गट विकास अधिकारी सुशील अंधारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये 2448 बचत गट कार्यरत असून त्यामध्ये 24480 सभासद स्वतःचा व्यवसाय करत आहेत. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 242 बचत गटांना 10 कोटी 48 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याचे उन्नत अभियानाचे तालुका व्यवस्थापक कृणाल पाटील यांनी सांगितले आहे. यातील अनेक पदार्थ,वस्तू आता अमेझॉन वर मिळत असून त्यांची ऑनलाइन विक्री केली जात आहे.
What's Your Reaction?