आपण प्रजासत्ताक नागरिक आहोत!

आपण प्रजासत्ताक नागरिक आहोत!

संडे स्पेशल, प्रशांत वाघमारे 
आपण प्रजासत्ताक नागरिक आहोत!
      आज आपण 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी वअर्थशास्त्र1950 रोजी पूर्ण प्रजासत्ताक घोषित केलेले व तेवढ्या समर्थपणे अंगीकारत असलेले भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे. माणूस हा सर्वश्रेष्ठ मानून, प्रजासत्ताक भारताच्या संविधानाची उद्देशिका स्वतः प्रत अर्पण करणारा भारत हा एकमेव देश आहे. परंतु भारतातील प्रत्येक नागरिकांनी मनावर ठामपणे बिंबवायला हवे, आपण भारतीय प्रजासत्ताक गणराज्याचे नागरिक आहोत !
      भारतामध्ये देशाचा प्रमुख हा वारसा हक्काने न निवडता लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो. त्याचबरोबर सर्व शासकीय पदे सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देश हा जनतेची सार्वजनिक मालमत्ता आहे. कोण्या एका व्यक्तीचा किंवा गटाचा देशावर कधीही हक्क नाही. भारतामध्ये जनसामान्यानुसार व लोक नियंत्रणाखाली असणारी शासन पद्धती आहे म्हणूनच आपण भारताला गणराज्य म्हणतो. त्याचबरोबर संघराज्य हे अधिकार वाटण्याची व्यवस्था आहे.
      आता महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे, भारतासारख्या प्रजासत्ताक  गणराज्यात मानवी मूल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे का? आज पर्यंत यातील किती मुल्ये आपण प्रामाणिकपणे अवलंबलेले आहेत? याचाच विचार करण्याची गरज प्रत्येकास निर्माण झालेली आहे.
     विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य आपण भारतात उपभोगतो. सद्यस्थितीचा विचार केल्यास आपले स्वातंत्र्य हे सामूहिक कल्याणाचे भान राखणारे असायला हवे, हेच आपण विसरून जातोय. स्वतःच्या स्वातंत्र्याची जाणीव करून देत असताना, इतरांच्या स्वातंत्र्यावर मात्र आपण गदा आणतोय!  सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायाच्या गोष्टी आपण करतो. समाजात मात्र प्रत्यक्षपणे वावरत असताना या सर्व न्यायाला आपण तिलांजलीच देतो. त्यासाठी अनेक पळवाटा शोधतो. दिवसेंदिवस माणसा-माणसातील वाढत जाणारी दरी हे याचेच प्रतीक आहे. 
      भारतामध्ये दर्जाची आणि संधीची समानता असतानाही अनेक गैर मार्गाचा वापर उघडपणे होताना लोकांना जाणवतो. परंतु दर्जेदार तरुणाईने योग्य संधीचा वापर केल्याने सध्या प्रत्येक क्षेत्रात ते प्रगतीपथावर जाताना दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रजासत्ताक नागरिक म्हणून आपण समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा ही सांभाळायला हवी. प्रत्येकास जगण्याचा स्वतंत्र हक्क व अधिकार आहे हे माणसाने कधीही विसरू नये. खऱ्या अर्थाने सध्याच्या वातावरणामध्ये सुरू असणाऱ्या माणसा माणसातील अविश्वासाचे हेच परिपूर्ण औषधआहे. त्यातूनच आपण राष्ट्राची एकात्मता साधू शकतो. 
       स्त्री पुरुष समानतेचा फक्त मुखवटा न चढवता,प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा अवलंब करण्याचा संकोच करू नये. पुरुषप्रधान समाजाची अजूनही वर्चस्वाची मानसिकता असली तरी, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे जात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत हे वास्तव आता स्वीकारायला हवे.
      26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेची घोषणा झाली आणि 9 डिसेंबर 1947 रोजी संविधान सभेच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.2 वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान तयार झाले. अनेक सुधारणा आणि बदलानंतर संविधान सभेच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हस्तलिखित कायद्याच्या 2 प्रतीवर स्वाक्षरी केली. त्यानंतर 26 जानेवारी रोजी तो कायदा देशात लागू करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधानातील योगदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 26 जानेवारी चे महत्व लक्षात ठेवता याच दिवशी भारताला प्रजासत्ताक लोकशाहीचे महत्त्व देण्यात आले.
      भारत जगातील एक सर्वश्रेष्ठ राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. परंतु प्रत्येक नागरिकांनी भारतीय गणराज्याचा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना  हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून मानवी मूल्ये प्रत्यक्षात आचरणात आणून संविधानाचे पालन करायला हवे. फक्त राष्ट्रध्वजाला सलामी देऊन न थांबता, त्याची सुरुवात आज पासूनच छोट्या छोट्या गोष्टी मधून करायला हवी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow