मकर संक्रांतीनिमित्त, सामाजिक अभिसरणाचे व्हावे संक्रमण
संडे स्पेशल, प्रशांत वाघमारे.
मकर संक्रांतीनिमित्त,
सामाजिक अभिसरणाचे व्हावे संक्रमण
मकर संक्रांतीचा सण, सूर्याचा मकर राशीत होणारा सुखद प्रवेश सुचित करत असतो.राशीच्या एका विभागातून दुसऱ्या राशीत होणाऱ्या सूर्याच्या बारा हालचालीपैकी एकाचा संदर्भ म्हणजे मकर संक्रांत! थोडक्यात काय तर मकर संक्रांतीचा सण हा सकारात्मक जीवन दर्शवितो. हिवाळ्याची समाप्ती करून,निसर्गोत्सव साजरा करणाऱ्या वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल दर्शवितो. अगदी हीच निसर्गाची गोष्ट माणसांनी आता लक्षात घ्यायला हवी. गेल्या वर्षभरापासून माणसाला सतत अस्वस्थ करणारे सामाजिक अभिसरणाचे संक्रांतीच्या निमित्ताने सकारात्मक संक्रमण करायलाच हवे!
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या संक्रमणाने सामाजिक मन ग्रासलेले होते. दिवसा दिवसाला बिघडत जाणाऱ्या समाजातील अनेक घटना, माणसा माणसांमध्ये निर्माण होत चाललेली दरी यामुळे सामाजिक जीवनात सुखाने राहणाऱ्या माणसा माणसातील संवाद बिघडलेला होता का बिघडवलेला होता, ही खरंतर विचार करण्यासारखीच गोष्टी होती! परंतु आम्ही मात्र धिम्म! कुणाच्या तर मागे फरफटत जाणारे आणि स्वतःच्याच आयुष्याची, सामाजिकतेची वाट लावून घेणारे! परंतु आता हे बदलायलाच हवे कारण त्याचे सर्व संकेत आपल्या सणात, संस्कृतीतच दिलेले आहेत. ते आपण स्वीकारायलाच हवेत.
संक्रांतीच्या निमित्ताने आपण चांगल्या पिकासाठी निसर्गाचे आभार मानतो. खरंतर आपले सर्व सण निसर्गपूजक पर्यायाने शेती पूजक असतात. मकर संक्रांतीच्या सणांमध्ये त्या कालावधीत येणारी पिके भाज्या यांना मोठा मान असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी साजरा होणाऱ्या या सणामध्ये सध्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध असणारी बोरे, हरभऱ्याचा ढाळा, ऊस, शेंगा, गाजर, ज्वारीचे कणीस, घेवडा, पावटा, वांगी, बटाटे, मटार, हरभरा, चाकवत, मातीचे भांडे यासारख्या निसर्गातील सर्व गोष्टींना मान देऊन त्यांची पूजा आपण करतो. मग आपण निसर्गासोबत राहून समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक माणसाचे महत्त्व जाणून त्याला मान हा दिलाच पाहिजे.
संक्रांतीच्या निमित्ताने दिले जाणारे तिळगुळ समाजात परस्परांविषयी असणारा राग सोडणे व क्षमा करण्यासाठीच असतात, हे आपण विसरतोय. संक्रांतीच्या निमित्ताने जागतिक आकर्षण ठरलेला पतंग उत्सव आपणास भूतकाळ सोडून, नवीन सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देतो. हा कालावधी नवीन उपक्रम व आशीर्वादासाठी आदर्श ठरलेला असतो. या नैसर्गिक तत्त्वांचा स्वीकार करत समाजातील प्रत्येक घटकांनी आता एकत्र येऊन दुभंगलेली मने सांधण्याचा प्रयत्न करायला हवा. समाजामध्ये सतत वाढत चाललेली अस्वस्थता संपवायला हवी.
पंजाब मध्ये लोहरी, तामिळनाडू पोंगल, आसाम मध्ये वाघ बिहू तर महाराष्ट्रात संक्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामाजिक सणामध्ये आपण घरामध्ये रंगीबेरंगी सजावट करतो, प्रत्येकाच्या घरी जाऊन तिळगुळ देतो. गाणी गातो. आपल्या सगळ्यां जिवलगांना भेटवस्तू देतो, मेळे,नृत्य, शेकोटी पेटवणे, मेजवानी याद्वारे हा साजरा करत असतो. त्याचबरोबर गरजूंना अन्न आणि कपड्यांचे वाटप करतो. हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिला भगिनी भेटवस्तू बरोबरच गृह उपयोगी वस्तू, झाडांची रोपे व पुस्तकांचे वाटप करतात. अशा अनेक सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या उपयोगी असणाऱ्या गोष्टी आपण करतो. त्याचबरोबर आपण आपली सामाजिकता सकारात्मक करायला हवी. परस्परांतील भेदभाव नष्ट करून परस्पर सहकार्य, आपुलकी व प्रेमाचे दान करायला हवे.
अभिसरण म्हणजे दोन किंवा अधिक भिन्न घटक किंवा घटनांचे एकत्र येणे! त्यामुळे विखुरलेल्या सामाजिक सामग्रीतून प्रभावीपणे, प्रसंगांरूप, सहाय्यक माध्यमाद्वारे अस्सल अनुभवाचे सामाजिक ज्ञान आता आपण मिळवायला हवे. तरच येणाऱ्या संक्रांतीच्या निमित्ताने आपण सामाजिक अभिसरण साधू शकू. इथून पुढे हळूहळू दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाणार आहे या निसर्गाच्या घटनांचा विचार केल्यास आपल्याही मनात साठलेली अस्वस्थता, गोंधळ हळूहळू कमी करत आपण समाजाच्या एकत्रिकणावर भर दिला तरच सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असणाऱ्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकारात्मक सामाजिक अभिसरण साधू शकतो.
What's Your Reaction?