गेट-टुगेदर सर्वांनी साजरे करायलाच हवे : धावपळीच्या जीवनात हाच आनंदाचा झरा

गेट-टुगेदर सर्वांनी साजरे करायलाच हवे : धावपळीच्या जीवनात हाच आनंदाचा झरा

संडे स्पेशल, प्रशांत वाघमारे. 
गेट-टुगेदर सर्वांनी साजरे करायलाच हवे : धावपळीच्या जीवनात हाच आनंदाचा झरा
        नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर लहानान पासून ते जेष्ठा पर्यंत सर्वांनाच ओढ लागते ती गेट-टुगेदरची ! सध्या मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी गेट-टुगेदर साजरी व्हायला लागलेले आहेत.प्रचंड धावपळीच्या जगात, आयुष्यभर आपण एक एक जबाबदारी पार पाडत सतत पळतच असतो. मनात असूनही आपण आपल्या जिवलगांना भेटू शकत नाही. परंतू प्रचंड व्यापतही त्यांच्यासाठी एक कप्पा कायम रिकामाच असतो. अशा या जिवलगांना , मित्रांना कधी एकदा भेटतोय, असे होऊन जाते. त्यासाठी प्रत्येक जण संधी शोधतच असतो. हीच संधी आपणाला मिळते गेट-टुगेदर च्या माध्यमातून. त्यासाठी ह्या नवीन वर्षात सुरवातीलाच साजरे करायलाच हवे गेट-टुगेदर!
       *शिक्षण, नोकरी, व्यवसाय, बदली,लग्न यासारख्या अनेक निमित्ताने आपण आपले घर, गाव, शहर, नातेवाईक,मित्र यांच्यापासून दुरावलेले असतो. ज्यांच्या वाचून, ज्यांच्या सानिध्याविना आपला एक क्षणही जात नसतो अशा मित्रांना आपण गेल्या कित्येक वर्षात भेटलेले ही नसतो. ही खंत सतत मनात कुठेतरी बोचत राहत असते. मोबाईलचे फार कमी फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरावलेले मित्र,जिवलग आपणास पुन्हा गवसतात. अगदी प्राथमिक - माध्यमिक शाळेतला, किंवा गल्लीतला लंगोटीयार, घराशेजारचा बालमित्रह, बालमैत्रीण आयुष्याच्या उत्तरार्धात आपणास सापडतातच आणि ते प्रचंड आनंदही देऊन जातात. अगदी जवळचे, दुरावलेले नातेवाईक हे आता आपणास या सोशल मीडियामुळे भेटत आहेत. कधी एकदा आपण या सर्वांना भेटतोय असं आपलं होऊन जातं. या सर्वांना भेटण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. या सर्वांना भेटता यावं, परत एकदा मनमोकळा आनंद मिळावा. यासाठी कुणीतरी एक जण खटाटोप करतो, सर्वांशी चर्चा होऊन प्लॅन ठरतो आणि सर्वांना सोयीस्कर होईल अशा ठिकाणी साजरे होते गेट-टुगेदर*. 
      गेट-टुगेदर म्हणजे लोक एकत्र जमण्याचा दुर्मिळ योगायोग.याच्या माध्यमातून नातलग, जीवाभावाचे मित्र, शाळा कॉलेजचे सहकारी यांचे नाते टिकते व परिपक्वतेने फुलते ही. गेट-टुगेदरचे ठिकाण शाळा कॉलेज पासून सुरू होते. त्यानंतर मात्र समविचारी, समवयस्क नवीन जागा किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेट-टुगेदर साजरा करून आयुष्याचा आनंद घेत असतात. 
      *शाळा कॉलेजमध्ये असतानाचे किंवा घराशेजारी असणारे आपले काही सहकारी की, ज्यांचं आपलं क्षणभरही पटत नाही असे लोक गेट-टुगेदर च्या माध्यमातून एकत्र येऊन पुन्हा नव्याने सकारात्मक सुरुवात करतात. सतत एकमेकांवर कुरघोडी करणारे, बऱ्याच वर्षानंतर कडकडून भेटून एकमेकांच्या उपयोगी पडतात. मन रिकामी होतात.भरभरून बोललं जातं. पूर्वी झालेल्या चुकांबद्दल मनापासून माफी मागितली जाते व तेवढ्याच मोठ्या मनाने माफही केलं जातं. उलट त्या त्या प्रसंगाचा अगदी हसून आनंद घेतला जातो.आयुष्यात अत्यंत महत्त्वाची मदत मिळाल्याबद्दल राहून गेलेले आभारीही गेट-टुगेदर च्या माध्यमातून मानले जातात*.
       ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो या प्रश्नाचं सतत मनात कुठेतरी असणार काहुरही गेट-टुगेदर च्या माध्यमातून मिटल जातं. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यात, बोलण्यात एक वेगळाच मनस्वी आनंद मिळतो. वयाच्या परिपक्वते बरोबर विचारांची परिपक्वता ही यातून जाणवत असते.
   आपण आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती गेट-टुगेदर हे साजरे करायलाच हवे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होत असतात. ज्या आपणास मानसिक  आनंद देऊन जातात. आयुष्यातला सर्वश्रेष्ठ काळ असतो तो बालपणाचा. तो आपण केव्हाच हरवून गेलेला असतो. गेट-टुगेदरच्या माध्यमातून बालपणीचा सहवास  आपणास मिळत असतो त्यातून निर्मळ आनंद तर मिळतोच मिळतो, पण एकमेकांच्या सुखदुःखाचे शेअरिंग ही होतं. त्यावरती अनेक अनुभवाचे उपाय शोधले जातात. एकमेकांची मन हलकी होतात. आयुष्यभर केलेल्या एकमेकांच्या मदतीबद्दल आभारी मानलं जातं आणि मदत न केल्याबद्दल माफी मागितली जाते. गेट-टुगेदर च्या माध्यमातून एकमेकांच्या कल्पनांना खतपाणी घातलं जातं. त्यातून अनेक नवीन गोष्टी उदयाला येतात. ज्याचा उपयोग सर्वांनाच होतो. आपण एकत्र आल्यानंतर नवनवीन गोष्टी शिकत असतो. गेट-टुगेदर च्या माध्यमातून जुन्या मित्रांना भेटण्याची सोन्यासारखी संधी आपणास मिळते आणि आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेतो. गेट-टुगेदर च्या माध्यमातून बहुतेक जणांच्या बिजनेसमध्ये, व्यवसायामध्ये वाढ होते. व्यवसायाचे अनेक फंडे आपण एकमेकांकडून शिकून घेतो. व्यवसायाची नवीन कल्पना आपणास समजते. व्यवसाय बद्दलच्या अनेक शंकांचे निरसन ही गेट-टुगेदर च्या माध्यमातून होते. आपण एकमेकांना मदत मागू शकतो.अडचणीतील जिवलगाला मदत कशी करता येईल याची देवाने घेवाणही गेट-टुगेदर च्या माध्यमातून होते. अनेक वेळा दुसऱ्याच्या कर्तुत्वाचा हेवा करणारे आपण  गेट-टुगेदर च्या माध्यमातून आपल्या मित्राच्या कर्तृत्वाचा हेवा न वाटता त्याचा अभिमान वाटतो व त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या बोलातून आपण त्याच्या कर्तुत्वाचा सक्रिय उत्सव साजरा करतो.आपल्या मित्राचे भले व्हावे हा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून गेट-टुगेदर मध्ये आपण प्रामाणिक व रचनात्मक टीकाही करतो. ती सर्वजण सकारात्मकतेने घेतात. स्तुती करणाऱ्यांपेक्षा रास्त चुका दाखवणाराच आपला खरा मित्र असतो. आपणास योग्य वेळी योग्य सल्ला मिळतो. गेट-टुगेदर च्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. ज्याचा समाजातील प्रत्येक स्तरावरील नागरिकांना उपयोग होतो. यातूनच पुढे फार मोठे समाज उपयोगी कार्य उभा राहिल्याचे आपणास नजरेस पडते.
      आपण सर्वजण एकमेकांसाठी आहोत ही नवी ताकद आपणास गेट-टुगेदर च्या माध्यमातून मिळते. त्यासाठी विविध वयोगटातील, विविध क्षेत्रातील गेट-टुगेदर ही व्हायलाच हवीत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर अशी गेट-टुगेदर झाली तर वर्षभर त्याचे अनेक फायदे आपणास मिळतात व आयुष्य सुखकर आनंदीपणे जगण्यास मदतच मिळते. मग येताय ना एकत्र गेट-टुगेदर च्या माध्यमातून पुन्हा एकदा मनसोक्त हसण्यासाठी, निर्मळ आनंद घेण्यासाठी आणि सकारात्मकतेने जगण्यासाठी!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow