नवीन वर्षाचा संकल्प करूया, सेंद्रिय भाजीपाला घरीच पिकवूया
संडे स्पेशल प्रशांत वाघमारे
नवीन वर्षाचा संकल्प करूया,
सेंद्रिय भाजीपाला घरीच पिकवूया
नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो आणि ते विसरूनही जातो. काही छोटे छोटे संकल्प करून ते अमलात आणणे, आपल्या जगण्यासाठी आवश्यकच असते.कॅन्सर सारखा राक्षस प्रत्येकाच्या दारात उभा असताना,अधिक उत्पादनाच्या लालसेपोटी प्रचंड रासायनिक कीटकनाशकाचा वापर केलेल्या भाजीपाला आपण रोजच बाजारातून विकत आणतो आणि अनेक रोगांना निमंत्रण देतो. आपले दुर्दैव असे की, लाखो रुपयांचे शेतीमालाचे उत्पादन घेणारा 99 टक्के शेतकरी सुद्धा घरी जाताना बाजारातलाच भाजीपाला घरी नेतो. आरोग्यास अत्यंत घातक असणारा हा रासायनिक फवारायुक्त भाजीपाला आपणास आपल्या आरोग्यावरती लाखो रुपये खर्च करायला लावतो आणि निमुटपणे आपण तो करतो. आपण जिवंत तर; जग जिवंत, स्वतःच्या आयुष्यापेक्षा; आरोग्यापेक्षा तर जगात कोणती गोष्ट मोठी नाही, त्यासाठीच स्वतःच्या सदृढ; समृद्ध आयुष्यासाठी नवीन वर्षाचा संकल्प करूया सेंद्रिय भाजीपाला घरीच पिकवुया!
सेंद्रिय शेतीमध्ये जमीन जिवंत राहते. उत्पादकता वाढते, जमिनीच्या सुरक्षितते बरोबरच मानवी आरोग्याची सुरक्षितता राहते व जमिनीचा पोत खराब होत नाही. सेंद्रिय शेतीचे व प्रत्येक घरी देशी गाईच्या संगोपनाचे महत्त्वाचं आजही लक्षात आले नाही. सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार पुरेशा प्रमाणात झाला नाही. अधिक उत्पादनाची लालसा असणाऱ्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीत उत्पादनाचे सातत्य कमी राहते व ग्राहक तुटतो ही भीती राहते. सेंद्रिय शेतीत कष्ट जास्त असते. शेती करण्याची किचकट पद्धत असते आणि शिवाय मिळालेल्या उत्पन्नाचे मार्केटिंग कमी होते. परिणामी अधिक पैसे मिळत नाहीत, त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे लोक वळत नाहीत. त्यामुळे लोकांनी आता सेंद्रिय भाजीपाला रोजच मिळेल या आशेवर न राहता स्वतःच्या कुटुंबास आवश्यक असणारा सेंद्रिय भाजीपाला घरीच पिकवणे आवश्यकच आहे.
आपल्या भागात येणाऱ्या भाजीपाला आपण आपल्या घरीच कुंडीत किंवा घरा शेजारच्या; पाठीमागील किवा पुढील जागेत परसबाग करून लावू शकतो. आता दोन-तीन मजली व्हर्टिकल गार्डनचे स्ट्रक्चर बाजारात मिळते. त्यामध्येही आपण भाजीपाला लावू शकतो. काळी किंवा माळावरच्या मातीमध्ये जुने झालेले कुजलेले शेणखत, गोकृपा (गुळाचे पाणी व गायचे ताक) कंपोस्ट खत, गांडूळ खत, लेंडी खत, कोंबडी खत, मासळी खत, मूत्रखत,रक्त खत, हाडाचे खत, कत्तलखान्यातील घाटा यासारखे खत वापरून आपण सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवू शकतो.
देशी बियाणे विकत घेऊन सेंद्रिय भाजीपाला आपल्या घरीच पिकून खाल्ल्याने आपणास ताजा, सकस, कीटकनाशक मुक्त भाजपाला वर्षभर मिळतो. त्यामुळे पर्यावरण शुद्ध राहते व निसर्गाचे सानिध्य आपणास लाभते. बागकाम केल्याने शारीरिक व बौद्धिक व्यायाम होतो व मनावरचा ताणही कमी होतो. आपल्या दैनंदिन खर्चात बचत होते. घराच्या आसपासच्या रिकाम्या जागेचा व सांडपाणी; कचऱ्याचा योग्य वापर होतो. घराच्या परिसराचे वातावरण शुद्ध होते. आपण पिकवलेली ताजी भाजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. मुलांमध्ये नैसर्गिक सौंदर्याची जाण निर्माण होऊन त्यांना बागकामाची आवड निर्माण होते. त्यामुळे घराची सौंदर्य वाढते. त्याचबरोबर आपणास आरोग्यास उपयुक्त असणारे उच्च पोषक तत्वे मिळतात, कीटकांच्या संपर्कात येण्याचा धोका कमी होतो. आपणास जेवणामध्ये समृद्ध चव मिळते. प्रति जैविक प्रतिरोधक जिवाणूंचा धोका कमी होतो. पचनशक्ती सुधारते. रोज ताजे व फायबरयुक्त अन्न मिळते आणि अनेक कारणाने होणारी जळजळ कमी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्त वजन व लठ्ठपणा कमी होतो.कर्करोग व हृदय रोगाचा धोका कमी होतो.
मिळेल त्या जागेत जिथे मोकळी हवा व सूर्यप्रकाश मिळतो अशा ठिकाणी आपण परसबाग निर्माण करू शकतो मात्र ती मोठ्या झाडापासून दूर हवी वेलवर्णीय भाज्या आपण कुंपणावरती लावू शकतो. सेंद्रिय भाजपाला उत्पादन हा शाश्वत शेतीचा एक महत्त्वाचा घटक आहे जो पर्यावरण संरक्षण, मानवी आरोग्य आणि आर्थिक फायद्यांना प्रोत्साहन देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याची आता आपणच काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आता आपण नवीन वर्षाचा संकल्प करूया आणि सेंद्रिय भाजीपाला स्वतःच्या घरीच पिकवूया.
What's Your Reaction?